स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र महाबळेश्‍वरला उभारणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; पर्यटन विकासाचा घेतला आढावा, इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सूचना

सातारा – महाबळेश्‍वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे, यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कृषी विभागाला दिल्या.

राजभवनातील बैठक कक्षात महाबळेश्‍वर पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूर वन परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक डॉ. बेन क्‍लेमंट, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची उपस्थिती होती.

उत्तम संशोधन झाल्यास स्ट्रॉबेरीचा दर्जा व उत्पादन वाढेल, तसेच राज्यातील इतर अनुकूल भागांतही स्ट्रॉबेरी पिक घेता येऊ शकेल यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. महाबळेश्‍वर एक लोकप्रिय ठिकाण असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी संख्या असते. साहजिकच वाहनांची समस्या आहे.

यासाठी महाबळेश्‍वरच्या बाहेरील भागात मोठे वाहनतळ करून बॅटरी किंवा इलक्‍ट्रिक संचलित वाहनांचा उपयोग करता येईल का हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. महाबळेश्‍वरप्रमाणे परिसरातील पर्यटनस्थळांचादेखील विकास होण्याबरोबरच ती लोकप्रिय होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. येथील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी कालबध्द रितीने मंत्रालयातून मान्यता देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करा : आदित्य ठाकरे
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “”उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न व्हायला हवेत. महाबळेश्‍वर येथे भारतातूनच नव्हे तर इतर देशांतूनही पर्यटक येतात. याठिकाणी बहुभाषिक पोलीस आणि मार्गदर्शक असल्यास विविधभाषी पर्यटकांना त्याचा फायदा होईल.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.