ग्रामीण भागातील युवकांची पंचाईत : जुन्नर तालुक्यातील विक्री दालनावर परिणाम
ओझर- चीनमध्ये करोनाचा आजार बळावल्यामुळे तेथील अर्थकारण ठप्प झाले आहे. मात्र, मोबाइल विक्रीसाठी जगभरात अग्रेसर असलेल्या चीनमध्ये उत्पादनात घट आल्यामुळे भारतीय बाजारपेठेत त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तसेच आयातीवर परिणाम झाल्याचा फटका महागाईच्या रुपात सोसावा लागत आहे.
गेल्या तीन आठवड्यापासून भारतीय बाजारपेठेत मोबाइल विक्रीवर थोडा परिणाम जाणवत आहे. त्याची झळ आता ग्रामीण भागात पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, बारामती, दौंड आदी मोठ्या तालुक्यातील बाजारपेठेत मोबाइल विक्रीचे दालन थाटले आहे. त्यामुळे गावगाड्यातील ग्राहक आता शहराची वाट न धरता गाव अथवा तालुक्याच्या ठिकाणी मोबाइलची खरेदी करीत आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोबाइल विक्री आणि सेवेत आमुलाग्र बदल झाला आहे. सध्या चीनमध्ये करोनाची साथ आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मोबाइल विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच दुरूस्तीसाठी चीनमधून आयात होणारे स्पेअर पार्टची आयात थंडावली आहे. जगभरात 80 ते 90 टक्के मोबाइल आणि स्पेअर पार्टची निर्यात करणाऱ्या चीनमधील करोनाची साथ अर्थकारणावर परिणाम करीत आहेत.
- व्यावसायिक, दुरूस्ती करणारे धास्तावले
जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या बाजारपेठा आहेत. त्यात आळेफाटा, थेऊर, नारायणगाव, जुन्नर, ओझर, अन्य गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये मोबाइल विक्री आणि दुरूस्तीचे दुकाने आहेत. त्यांच्यावर परिणाम झाला आहे. या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या तरूणांना फटका सोसावा लागत आहे. स्पेअर पार्टची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे अजून किती दिवसांत करोनाची बाधा लुप्त होणार, याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.