मुंबई: महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 24 डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. यामध्ये शिवसेनेचे 10 मंत्री, राष्ट्रवादीचे 11 तर काँग्रेसचे 8 मंत्री शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला होता. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. त्यामुळे विरोधकांच्या टीकेचा सामना देखील सत्ताधाऱ्यांना करावा लागला.
हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने तात्पुरते खातेवाटप जाहीर केले होते. मात्र आता कुणाला मंत्रीपदे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.