पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेची लाट आली आहे. सोमवारी (दि. 27) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वोच्च 47.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस अकोला, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेचा “आॅरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून अकोला, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, ब्रह्मपुरी यांसह मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर आणि मालेगावमध्ये उन्हाचा पारा 44 ते 46 अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. त्यामुळे अंग अक्षरश: भाजून निघत असल्याची परिस्थिती झाली आहे.
दुसऱ्या बाजूला मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. तर मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर यांसह कोकण-गोव्यातील बहुतांश भागांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील काही प्रमुख भागातील कमाल तापमान
ब्रह्मपुरी – 47.1, नागपूर – 45.6, अमरावती आणि वर्धा – 45, चंद्रपूर – 44.8, गोंदिया – 44.5, यवतमाळ – 42.5, अकोला – 42.2, जळगाव – 42, मालेगाव – 41.8 ,परभणी आणि वाशिम – 41.2, बीड – 41.1, नांदेड – 40.8, अंश से.