पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध मिळकतींवरील शास्तीकर पूर्ण माफ करण्याचा अध्यादेश आज काढण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार 3 मार्च 2023 पर्यंत म्हणजेच हा शासन आदेश निर्गमित होण्याच्या दिनांकांपर्यंतच्या अवैध बांधकामांना लागू असणार आहे. या अध्यादेशानुसार गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबित असलेला शास्तीकराचा प्रश्न आता कायमस्वरुपी सुटला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अवैध बांधकाम शास्ती रकमेचे प्रमाण मूळ करापेक्षा अधिक असल्याने शास्तीची रक्कम भरण्याबाबत या मालमत्ताधारकांमध्ये उदासीनता आढळून येत आहे. भविष्यात शास्ती माफ होईल, या अपेक्षेने मालमत्ताधारेक शास्तीसह मूळ कराचाही भरणा करीत नाहीत. त्यामुळे शास्ती माफ केल्यास, मूळ करचा भरणा होईल, व स्थायी उत्पन्नात वाढ होईल, या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांना देय असलेली शास्ती माफ करण्यात आली आहे.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शास्तीकर माफीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर माफीची घोषणा केली होती. आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे सभागृहात मांडली होती. त्यामुळे शहरातील सुमारे 1 लाख मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत शास्तीकराचा “जीआर’ लवकरच काढण्यात येईल, अशी घोषणा केली होती. गुरुवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने “जीआर’ प्रसिद्ध केला. त्यामुळे राज्य सरकारच्या कामगिरीवर सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
शास्ती माफ म्हणजे अवैध बांधकाम नियमित असे नाही
राज्य सरकारने महापालिका हद्दीतील सर्व मिळकतींची शास्ती माफ केली असली, तरी या सर्व मिळकती व बांधकामे नियमित झाली, असे समजण्याची कारण नसल्याचे या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध बांधकामे नियमित झाली असे मानता येणार नसल्याचे स्पष्ट आहे.
गेल्या 14 वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर शास्तीकराचा बोजा लादण्यात आला होता. त्यामुळे सुमारे 1 लाख मिळकतधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शास्तीकर पूर्ण माफीची घोषणा झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. शास्तीकर माफीच्या लढ्यामध्ये मोठे योगदान देणारे दिवंगत लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी आपआपल्या परीने पुढाकार घेतला. त्या सर्वांचे धन्यवाद देतो.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.