पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्टोबरमध्ये अंतिम वर्ष ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेतल्या. त्यामध्ये परीक्षेचे काम केलेल्या प्राध्यापकांसह सर्व घटकांना मानधन देण्याबाबतच्या प्रस्तावावर सोमवारी परीक्षा विभागात अधिष्ठातांच्या उपस्थितीत चर्चा झाली. त्यामुळे परीक्षेचे काम केलेल्या प्राध्यापकांना मानधन मिळण्याची चिन्हे आहेत.
करोना पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन, तर पन्नास हजार जणांची ऑफलाइन परीक्षा घेतली. ही परीक्षा घेत असताना बहुपर्यायी प्रश्नसंच तयार करणारे प्राध्यापक, ऑफलाइन परीक्षेसाठी महाविद्यालयात व्यवस्था करणे, पर्यवेक्षक, महाविद्यालय परीक्षा नियंत्रक यासह इतर घटकांना मानधन देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. करोनाची गंभीर स्थिती लक्षात घेता परीक्षेचे काम केलेल्या प्राध्यापकांना मानधन देण्याबाबत काहीच कार्यवाही होऊ शकली नाही.
त्या पार्श्वभूमीवर सोमवारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात झालेल्या बैठकीत चर्चा झाली. यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकांसह अधिष्ठाता उपस्थित होते. करोना संकटकाळात ऑफलाइन परीक्षा घेतलेल्या परीक्षा केंद्रात सर्वच घटकांनी मदत केल्याने ही परीक्षा योग्य पद्धतीने पार पडली. त्याचा विचार करून त्यांना मानधन मिळायला हवी, यावर चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला जाणार आहे. त्यावर मानधन संदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.