पुणे – शहरातील वाहतूक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने वाहतूक विभागाकडून विविध भागांतील वाहतुकीत बदल केला आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी वगळता अन्य वाहनांसाठी या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात सूचना किंवा हरकती असल्यास 30 जानेवारीपर्यंत येरवडा येथील वाहतूक कार्यालयात पाठवता येणार आहे.
समर्थ वाहतूक विभागांतर्गत के.ई.एम हॉस्पिटल मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजुला नो-पार्किंग केले आहे. माळी महाराज रोडवरील अशिक हॉटेल ते तोडकर हॉस्पिटल बरके आळी चौक येथे पी 1 पी 2 प्रमाणे पार्किंग केले आहे. तर, कोंढवा वाहतूक विभागांतर्गत शंकरराव विठ्ठलराव घुले चौक ते प्रिस्टेज सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला चौकापासून सुमारे 50 मीटर पुढे पी 1 पी 2 प्रमाणे पार्किंग केले आहे. तर, शंकरराव विठ्ठलराव घुले चौक ते अर्चना पॅराडाईज सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजुला चौकापासून 50 मीटर पुढे पी 1 पी 2 प्रमाणे पार्किंग केले आहे.
वानवडी वाहतूक विभागांतर्गत शिवरकर रस्ता येथे फातिमानगर चौक ते डायमंड बेकरी कॉर्नर, बॅंक ऑफ महाराष्ट्र ते शिवरकर उद्यान मेनगेट, ऑक्सफर्ड व्हिलेज मेनगेट ते एबीसी फार्म चौक येथे दुतर्फा नो पार्किंग केले आहे.
डायमंड बेकरी कॉर्नर ते बॅंक ऑफ महाराष्ट्र, शिवरकर उद्यान मेनगेट ते साईसागर हॉटेल, संविधान सर्कल चौक ते ऑक्सफर्ड व्हिलेज मेनगेट येथे पी 1 पी 2 पार्किंग केले आहे. तर, मदर टेरेसा चौक ते संविधान सर्कल चौकदरम्यान दुतर्फा पार्किंग केले असून, जांभूळकर चौक ते जगताप चौकादरम्यान पूर्व बाजूस पूर्ण नो-पार्किंग आणि पश्चिम बाजूस पूर्ण पार्किंग केले आहे. यासह सिक्रेट टाऊन मेनगेट ते मदर टेरेसा चौक येथे डाव्या बाजूस नो पार्किंग केले आहे.