नवी दिल्ली : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहीमे विषयी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. चांद्रयान अगदी यशस्वीपणे पुढे जात असून आज सकाळी साडे आठ वाजता चांद्रयानाने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे. चांद्रयानाचे चंद्राभोवतीचे ऑर्बिट मॅन्युव्हर पूर्ण झाले असून, लवकरच प्रॉपल्शन आणि लँडर हे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. यामुळे आता इथून पुढचा प्रवास आणखी महत्वाचा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
इस्रोने आज ट्विट करत याविषयीची माहिती दिली. सध्या चांद्रयान हे चंद्राभोवती 153×163 एवढ्या कक्षेत फिरत असल्याचे इस्रोकडून सांगण्यात येत आहे.आता पुढील टप्प्यामध्ये म्हणजे उद्या प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल हे एकमेकांपासून वेगळे होणार असून याची वेळ अद्याप इस्रोने जाहीर केली नाही.
Chandrayaan-3 Mission:
Today’s successful firing, needed for a short duration, has put Chandrayaan-3 into an orbit of 153 km x 163 km, as intended.
With this, the lunar bound maneuvres are completed.
It’s time for preparations as the Propulsion Module and the Lander Module… pic.twitter.com/0Iwi8GrgVR
— ISRO (@isro) August 16, 2023
चांद्रयानामध्ये असणाऱ्या लँडरच्या आत रोव्हर फिट करण्यात आलं आहे. या दोन्हीला मिळून लँडर मॉड्यूल म्हटलं जातं. आता प्रॉपल्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलला चंद्रापासून 100 किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेईल. त्यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होतील.
यानंतर लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास करेल. साधारणपणे 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-३ ने अवकाशात झेप घेतली होती. चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे. अर्थात, रशियाचे लूना-25 हे यानदेखील सध्या चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. हे यान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शर्यतीत रशिया बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.