पत्ता, छायाचित्रे दाखलच्या घरमालकांना पोलीसांच्या सूचना
दौंड- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भा.द.वी. 144 प्रमाणे घर आणि जागा भाडेतत्त्वावर देताना भाडेकरुंची पूर्ण माहीती, पुरावे संबंधीत ग्रामपंचायत तसेच पोलीस स्टेशनमध्ये देणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या घरमालकांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याच्याही सूचना आहेत. दौंड शहरात सध्या परप्रांतियांचा भरणा होत असताना काही घरमालकांकडून याबाबत चालढकल होत आहे.
दौंड शहर तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी परप्रांतियांची माहिती पोलीस स्टेशनमध्ये संकलित असणे गरजेचे आहे. दौंड रेल्वे जंक्शन असल्याने देशातील कानाकोपऱ्यातून येथे येवून राहणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही लक्षणीय असताना त्यांना खोल्या, घरं भाडेतत्त्वार देण्याचा व्यावसायही अनेकांकडून केला जात आहे. परंतु, असे घरमालक परप्रांतियांची माहिती पोलीसांकडे देत नाहीत. यामुळे गुन्हा घडल्यानंतर तपासकामी अडचणी येत असल्याचीही उदाहरणे आहेत.
दौंड तालुक्यात रेल्वे जंक्शनसह औद्योगिक वसाहत असल्याने या परिसरात परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणात भरणा झाला आहे. या शिवाय दौंड शहरात व्यवसायाचा बहाणा करुन सुरवातीस एक दोनच्या संख्येत आलेले हे परप्रांतीय जम बसताच आपले नातेवाईक व इतरांना ही सोबत आणत असल्याने शहरी हवा लागलेल्यांकडून संघटीत गुन्हेगारीही केली जात असल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात दौंडचे पोलीस निरीक्षक — सुनिल महाडीक यांनी सांगितले की, भारतीय नागरीक संवीधान प्रमाणे देशात कोणीही कोठेही राहू शकत असले तरी तो ज्या भागात, गावात रहात आहे त्या बाबतची सर्व माहीती संबंधीत ग्रामपंचायत व जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तशी नोंद असणे बंधनकारक आहे. परंतु, परीसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक परप्रांतीयांकडे स्वत:चे ओळखपत्र नाही, त्यांची कुठली ही नोंद ग्रामपंचायत अथवा पोलीसांमध्ये आढळत नाही. ते ज्या घर मालकांकडे वास्तव्यास आहेत; अपवाद सोडला तर त्यांच्याकडे राहणाऱ्या अशा परप्रांतीयां विषयीची काही माहीती उपलब्ध होऊ शकत नाही. गेल्या काही काळात रेल्वे स्टेशनवरील भांडणे, हल्ले यासह वाळू माफियांची हाणामारी, खून अशा गुन्ह्यांत परप्रांतीय गुन्हेगारी वृत्तीचे लोक पोलीसांच्या तावडीत सापडले आहेत. यामुळे ज्या घरमालकांनी परप्रांतियांना खोल्या, घर भाडेतत्त्वार दिले आहे, अशांची माहिती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावी, असे आवाहनही करण्यात महाडीक यांनी केले आहे.
- काहींची रेशन कार्ड तयार?
दौंड तालुक्यातील काही गावांत परप्रांतीयांनी स्थनिकांना हाताशी धरुन चक्क रेशन कार्ड, मतदान कार्ड तयार केली असल्याची चर्चा आहे. याचा ही शोध घेणे तितकेच महत्वाचे आहे. भविष्यात ग्रामिण भागात ही अशा बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीयांकडून, भाडेकरुंकडून उदभवू शकणाऱ्या समस्या, धोके यांचा विचार करता प्रशासनाने या बाबतीत वेळीच व तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.