उंब्रज – घरबांधणीसाठी दिलेल्या पैशाच्या व्याजाची रक्कम कर्जदाराकडून मिळावी, यासाठी तगादा लावणाऱ्या नागठाणे (ता. जि. सातारा) येथील उदय दत्तात्रय बेंद्रे (वय 40) या केबल व्यवसायिकाविरोधात उंब्रज पोलिसांत खासगी सावकारीचा गुन्हा झाला आहे. याप्रकरणी उत्तम रघुनाथ वाघ (वय 40, रा. जगदाळेवाडी पो. कडवे बुद्रुक ता. पाटण) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी की, उदय बेंद्रे याने 5 मे 2019 रोजी घरबांधणीसाठी 50 हजार रूपयांचा एचडीएफसी बॅंकेचा धनादेश दिला होता. हा धनादेश नागठाणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत भरला होता. दिलेल्या कर्जाच्या रकमेच्या व्याजापोटी दि. 5 मे 2019 ते 16 मार्च 2020 या कालावधीत महिना 6 टक्के व्याजदराने पैशाची मागणी करुन मूळ रक्कम तशीच ठेवून नव्याने कर्जाची मुदत सुरु करण्यासाठी घेतलेली नोटरी पोलीस ठाण्यात दाखवून तुझ्यावर केस करीन, अशी धमकी संशयित देत होता. यावरून घरबांधणीसाठी दिलेल्या 50 हजाराच्या रकमेच्या व्याजापोटी टप्प्याटप्याने 45 हजार रूपये घेतले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार करीत आहेत.