फलटण – दुधेबावी (ता. फलटण) येथे सामायिक जमीन वाटपाच्या कारणावरुन कुऱ्हाड, लोखंडी पाईप, गजाने मारहाण करुन खून केल्याप्रकरणी चौघाजणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुधेबावी येथील ज्ञानदेव महादेव सोनवलकर यांना त्यांचे सख्खे भाऊ हणमंत महादेव सोनवलकर, सुनीता हणमंत सोनवलकर, अनिकेत हणमंत सोनवलकर आणि शंभूराज हणमंत सोनवलकर यांनी सामायिक जमीन वाटपाच्या कारणावरुन कुऱ्हाड, लोखंडी पाईप व गजाने मारहाण करुन जखमी केले होते. गंभीर जखमी झालेल्या ज्ञानदेव सोनवलकर यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी अनिता ज्ञानदेव सोनवलकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.