नवी दिल्ली – डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर 2020 च्या साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे नोंदवून त्यांच्या कठोर कारवाई करा अशा सुचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. डॉक्टर्स किंवा अन्य कोणत्याही आरोग्य सेवकांवरील हल्ल्यांच्या बाबतीत ही उपाययोजना करावी अशी सुचनाही राज्यांना करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकारांना हे पत्र पाठवले आहे. अलिकडच्या काळात देशात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. त्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी नुकतीच देशव्यापी निदर्शने करून या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होत राहिले तर त्यांचे नितीधैर्य खच्ची होईल आणि त्याचा विपरीत परिणाम देशाच्या आरोग्य सेवेवर होईल. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे गरजेचे ठरले आहे.
संबंधीतांवर साथ रोग नियंत्रण कायद्यान्वे गुन्हा दाखल केल्यास त्यांना पाच वर्षाचा कारावास आणि दोन लाख रूपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
जर अशा प्रकारच्या हल्ल्यात आरोग्य सेवेतील व्यक्तीला गंभीर इजा झाल्यास सात वर्षाचा कारावास आणि पाच लाख रूपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. असे गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे आहेत. या अनुषंगाने सोशल मिडीयावर केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक लिखाणावरही लक्ष ठेवण्याची सुचना गृह सचिवांनी केली आहे.