नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट चिंतेचे मुख्य कारण; एम्स प्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली – करोनाचा नवीन डेल्टा प्लस नावाचा विषाणु हा सध्या चिंतेचे प्रमुख कारण बनला आहे. या संबंधात बोलताना एम्स संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, भारतात बी 1. 617.2 जातीच्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव आढळून येत होता.

आता याच विषाणुने के 417 एन चे स्वरूप धारण केले असून यालाच डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणतात. याच जातीचा नवा विषाणुचा प्रकार भारतासाठी अधिक चिंताजनक ठरू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. ब्रिटन मध्ये याच विषाणुंचा सध्या मोठा प्रसार सुरू झाला आहे. ही बाब भारताने लक्षात ठेवण्याची गरज आहे.

त्यांनी म्हटले आहे की भारतात करोनाच्या संबंधातील काळजी नीटपणे घेतली गेली नाही तर या नवीन विषाणुचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होण्याची शक्‍यता आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट हा डेल्टा प्रकारच्या विषाणुंचा नवीन अवतार आहे. हा नवीन अवतार नेमका काय प्रादुर्भाव निर्माण करणार याकडे जाणिवपुर्वक लक्ष ठेऊन वागण्याची गरज आहे. हा नवीन विषाणु लसीकरणाचे संरक्षण झुगारून देऊ शकतो अशी शंका आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले औषधोपचार किंवा लसीकरण यामुळे तो कितपत नियंत्रणात येईल हे पहावे लागेल असे ते म्हणाले.

त्यामुळे विषाणुच्या या नवीन प्रकाराला आपण सहजपणे घेऊन चालणार नाही. त्यामुळे नवीन विषाणुचा अवतार निर्माण झाला आहे त्यापासून आपण सावध राहण्याची गरज आहे. जर आपण सावध राहिलो नाही तर येत्या तीन ते चार महिन्यात त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात असा इशाराही डॉ गुलेरिया यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.