नवी दिल्ली – “करोना’ व्हायरसच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीनेही 15 एप्रिलपर्यंत आपल्या सर्व स्पर्धांना स्वल्पविराम देण्याचे ठरवले आहे. या स्पर्धेत भारताचाही समावेश होता. तसेच टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी होणाऱ्या विविध द्विराष्ट्रीय स्पर्धाही यादरम्यान घेतल्या जाऊ नयेत, असे आवाहन एफआयएचने केले आहे.
दरम्यान, करोनाने जगभरात घेतलेल्या बळींनी 5 हजार हा आकडा ओलांडला आहे. जगातील 133 देशांमध्ये करोना फैलावला आहे. त्या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात 5 हजार 116 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये चीनमधील मृतांची संख्या सर्वांधिक 3 हजार 177 इतकी नोंदली गेली आहे. त्याखालोखाल इटलीत 1 हजार 16 जण तर इराणमध्ये 514 जण मृत्युमुखी पडले.