आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आदेश; उघड्या दुकानांवर होणार कारवाई
पिंपरी – करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेत शुक्रवार (दि.20) पासून केवळ 50 टक्के अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुटी दिली जाणार आहे. त्यातून अत्यावश्यक विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्याना वगळण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी (दि.19) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात बोलविले जाणार नाही. त्यांना या पुढे आळीपाळीने कार्यालयात बोलविले जाणार आहे. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यकतेनुसार अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची रजा मंजूर केली जाणार आहे. त्यामुळे पालिका कार्यालयात तसेच, वाहतूक व्यवस्थेतील गर्दी कमी होणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती किमान 50 टक्के राहील, यांची दक्षता घेतली जाणार आहे.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे संपर्क क्रमांक, पत्ता व मेल आयडी कार्यालयास उपलब्ध करून देणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे त्यांना आवश्यकता भासेल, त्या वेळी कामावर बोलाविले जाणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाचे उपाययोजनेसाठी प्रशासन, वैद्यकीय, आरोग्य विभाग व इतर विभागप्रमुखांमार्फत ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. तसेच, करोना सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना रजा दिली जाणार नाही.
माहिती लपविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई अशक्य
मॉस्को येथून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या आठ खासगी डॉक्टरांवर कारवाई करता येत नाही. मात्र, त्यांना तातडीने “होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती विमानतळ आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडून दररोज घेण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या त्या नागरिकांची तपासणी केली जात असून करोनासंदर्भात ब्लॅकलिस्ट केलेल्या देशातून आलेल्या प्रत्येक नागरिकांस “होम क्वारंटाईन’ करणे आवश्यक आहे.
दुकानांवर आजपासून कारवाई
दुकाने बंद न ठेवण्याऱ्यांवर पोलीस व होमगार्डच्या मदतीने शुक्रवार (दि.20) पासून कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात पालिकेचे आयुक्त, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी झाली. पिंपरी कॅम्पातील दुकानदारांना आज पोलिसांच्या उपस्थितीत समज देण्यात आली. शुक्रवारपासून शहरातील खुल्या असलेल्या सर्व दुकानांवर कारवाई केली जाईल, असे हर्डीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.