जीनिव्हा –जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांच्या विरुद्ध झ्युरिच येथील फुटबॉल संग्रहालयाच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला असून याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुटबॉल संग्रहालयाच्या संदर्भात फिफाचे तत्कालिक अध्यक्ष आणि सहकारी कंपन्यांनी केलेले व्यवहार हे गैरव्यस्थापनाचे होते. त्या विषयी फिफाच्या सध्याच्या व्यवस्थापनाने झ्युरिच सरकारकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, ब्लॅटर यांनी हे आरोप फेटाळले असून गैरव्यवहार झाल्याचाही इन्कार केला आहे.
संग्रहालय व्यवस्थापनाने तब्बल 462 दशलक्ष युरोचे बिल सादर केले होते. संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर झालेला हा खर्च खरे तर जागतिक फुटबॉलच्या विकासासाठी वापरता आला असता, असे फिफाच्या सध्याच्या व्यवस्थापनाचे मत आहे.
फिफाचे झ्युरिच येथील फुटबॉल संग्रहालयाचे काम ब्लॅटर यांनी जरी सुरू केले असले तरी त्याचे उद्घाटन फिफाचे विद्यमान अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांच्या हस्ते झाले. ब्लॅटर यांची हकालपट्टी झाल्यानंतर इन्फान्टिनो यांची नियुक्ती करण्यात आली होती. यूईएफएचे तत्कालीन सर्वेसर्वा मिशेल प्लॅटिनी यांना 20 लाख स्विस फ्रॅंक इतके पैसे देण्यावरून ब्लॅटर यांना सहा वर्षांसाठी फुटबॉलमधून निलंबित करण्यात आले होते.
विद्यमान अध्यक्ष इन्फान्टिनो यांची देखील आर्थिक गैरव्यवहारावरून स्वित्झर्लंडच्या विशेष न्यायालयात चौकशी सुरू असताना ही तक्रार करण्यात आली आहे. फिफाचे माजी ऍटर्नी जनरल मायकेल लॉबर यांच्याशी 2016 आणि 2017 मध्ये झालेल्या विशेष बैठकीवरून ही चौकशी सुरू आहे. इन्फान्टिनो यांनी 2017 साली एका खासगी विमानाचा वापर केला होता, त्याबाबतही चौकशी सुरू आहे.