उपमुख्यमंत्र्यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघांनी केलेले कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहतील.

पुढे ते म्हणतात, क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. त्यांचे कार्य आणि विचार पुढे नेण्यासाठी राज्य शासनातर्फे त्यांचा जन्मदिन ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.