चंडीगढ – पंजाबमधील आमदार रूपिंदर कौर रूबी यांनी आम आदमी पक्षाला (आप) रामराम ठोकून सत्तारूढ कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ती घडामोड ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपच्या दृष्टीने राजकीय हादरा ठरली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत रूपिंदर यांनी कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांनी आपवर टीकेची झोड उठवली. जनतेची सेवा करण्यासाठी मी याआधी आपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्या पक्षाकडून आम आदमीसाठी काहीच केले जात नाही.
आपच्या उक्तीत आणि कृतीत प्रचंड तफावत आहे. त्याउलट, कॉंग्रेस हाच सामान्य माणसासाठी बनलेला पक्ष आहे, असे त्या म्हणाल्या. पंजाबमधील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपमधून बाहेर पडून महिला आमदाराने केलेला प्रवेश कॉंग्रेसचे बळ वाढवणारा आहे.
दरम्यान, रूपिंदर यांच्या पक्षबदलाला फारसे महत्व देण्याचे आपने टाळले. आगामी निवडणुकीत रूपिंदर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती. त्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी पक्ष बदलला, अशी प्रतिक्रिया आपकडून देण्यात आली.