अबुधाबी – मोईन अलीचे अर्धशतक व डेव्हीड मलानची उपयुक्त खेळी यांच्या जोरावर इंग्लंडने आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या उपांत्य लढतीत 4 गडी गमावून 166 धावा केल्या.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या दुखापतग्रस्त जेसन रॉयच्या अनुपस्थितीत जॉनी बेअरस्टोने जोस बटलरसह डावाची सुरुवात केली. बेअरस्टो आक्रमक फलंदाजी करत होता. या जोडीने 37 धावांची सलामी दिली. मात्र, त्याचवेळी अनावश्यक फटका मारून बेअरस्टो 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर बटलरनेही धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली. त्याने 29 धावांची खेळी करताना डेव्हीड मलानसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
बटलर परतल्यावर फलंदाजीत बढती देण्यात आलेल्या मोईन अलीने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना मलानसह तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले. मलान 30 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 41 धावा करून परतला. तो बाद झाल्यावर लियाम लिव्हिंगस्टोनने मोईनला सुरेख साथ देत संघाला दीडशतकी धावांची मजल मारून दिली.
लिव्हिंगस्टोन अतिआक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात 17 धावांवर बाद झाला. दरम्यान, मोईन अलीने आपले अर्धशतक साकार केले. त्याने कर्णधार इयान मॉर्गनच्या साथीत संघाला 20 षटकांत 4 बाद 166 धावा अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली.
मोईनने आपल्या नाबाद 51 धावांच्या खेळीत 37 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावले. कर्णधार मॉर्गन 4 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून जेम्स निशाम, टीम साउदी, ऍडम मिल्ने व इश सोधी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड – 20 षटकांत 4 बाद 166 धावा. (डेव्हीड मलान 41, जोस बटलर 29, लियाम लिव्हिंगस्टोन 17, जॉनी बेअरस्टो 13, मोईन अली नाबाद 51, इयान मॉर्गन नाबाद 4, जेम्स निशाम 1-18, टीम साउदी 1-24, ऍडम मिल्ने 1-31, इश सोधी 1-32).