मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस त्यांच्यावर मानेच्या दुखण्यावर उपचार करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. दरम्यान या काळात एक छोटीशी शस्त्रक्रियाही होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातील विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करत आहे.
मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता. साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणले तरी थोडंसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.