अबाऊट टर्न : धास्ती

हिमांशू

भालचंद्र नेमाडे यांच्या “कोसला’ कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर आणि त्याचा मित्र सुरेश यांच्यातली “इतिहासाची बडबड’ खूप प्रसिद्ध आहे. हे दोघे स्वतःला दोन हजार वर्षांनंतरचे इतिहासकार समजून आजच्या परिस्थितीवर भाष्य करायचे. दोन हजार वर्षांपूर्वी लोक इतरांना दिसू नये, समजू नये अशा अनेक गोष्टी करीत होते, हे त्यावेळच्या समाजाला आश्‍चर्यकारक वाटेल, अशा आशयाचा एक संवाद या दोघांमध्ये एकदा घडतो. दोन हजार वर्षांनंतरचं सोडा, 1963 मध्ये ही कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हापासून अवघ्या छप्पन्न वर्षांतच माणसाचं खासगीपण जवळजवळ संपल्यासारखं जाणवू लागलंय. आपल्या खासगी आयुष्यात कधी, कोण आणि कोणत्या मार्गाने डोकावेल याचा नेम राहिलेला नाही.

सोशल मीडिया कंपन्यांनी वापरकर्त्यांची व्यक्‍तिगत माहिती कंपन्यांना विकल्याचे पूर्वीच समोर आलंय. कोणाची आवड काय आणि कोण कसा विचार करतो, यासंबंधीची माहिती विकत घेणाऱ्या कंपन्या त्यायोगे आपल्यावर ताबा मिळवू पाहतात. आपल्या आवडीनिवडी, गरजा जाणून आपल्याला त्यांच्या उत्पादनांकडे खेचतात. समाजकारण, अर्थकारण, राजकारणावरचा सोशल मीडियाचा प्रभाव किती झपाट्याने वाढतोय, हे आपण पाहतोच आहोत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत लोकांच्या मानसिकतेशी संबंधित अनेक बाबी सैबेरियातून “मॅनेज’ केल्याचा आरोप झाला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे आपण माणसाची प्रगती म्हणून पाहतो; परंतु तंत्रज्ञान कुणाच्या हाती राहते, यावरून त्याचा वापर कसा होणार हे ठरते.

कंपन्यांचा मायाबाजार आणि त्यात व्यक्‍तिगत माहितीचा वापर, हे चक्र किती विस्तारणार हा यक्षप्रश्‍न आहेच; परंतु सत्तेची ताकद वापरून तंत्रज्ञानाचा वापर केल्यास काय घडू शकते, याचे उदाहरण नुकतेच चीनमध्ये समोर आलंय. माणूस पर्यटनासाठी बाहेर पडतो तेव्हा आपण मनसोक्‍त, मोकळेपणाने फिरायचे, हेच त्याच्या मनात असतं. परंतु असा पर्यटक जेव्हा चीनमध्ये पोहोचतो, तेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये एक मालवेअर इन्स्टॉल केला जातो, अशी माहिती पुढे आलीय. पर्यटकाच्या मोबाइलमधील सगळ्या माहितीची चावी या मालवेअरच्या माध्यमातून चिनी अधिकाऱ्यांच्या हाती गवसते.

विशेषतः शिनजियांग शहरात येणाऱ्या पर्यटकांना मोबाइलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करायला भाग पाडले जातेय. “सेलहंटर’ नावाचा हा मालवेअर मोबाइलमधली सगळी माहिती स्कॅन करतो. पर्यटकाचे लोकेशनसुद्धा अधिकाऱ्यांना समजत असते आणि पर्यटकाला नजरकैदेत असल्यासारखेच फिरावे लागते, असा आरोप केला जातोय. अर्थात, पर्यटकाचे ट्रॅकिंग केले जात असल्याचे पुरावे अद्याप मिळाले नाहीत. परंतु आपल्या मोबाइलमध्ये मालवेअर इन्स्टॉल केल्यानंतर पर्यटकाला सतत शंका येत राहणे स्वाभाविक आहे. शिवाय, पर्यटकाच्या फोनमधल्या फाइल्स स्कॅन करणे योग्य ठरते का, या विषयीही चर्चा सुरू झालीय. तात्पर्य, स्मार्टफोन सतत आपल्यासोबत असला, तरी तो “पर्सनल’ राहिलाय का, हा प्रश्‍नच!

मोबाइल फोनच्या आगमनापासून आतापर्यंत आपण आपल्या मेंदूतल्या बऱ्याच गोष्टी मोबाइलकडे सोपवल्या आणि निर्धास्त झालो. गोष्टी लक्षात ठेवणे आवश्‍यक राहिले नाही. आता काही दिवसांनी फाइव्ह-जी नेटवर्क येईल. इंटरनेट ऑफ थिंग्ज, ऑर्ग्युमेन्टेड रिऍलिटी वगैरे तंत्रज्ञान येईल. मग आपण आपले घरही मोबाइलवर सोपवू शकू. घराबाहेर राहूनसुद्धा आपण विजेची उपकरणे, खिडक्‍या-दरवाजे आपल्या बोटांवर नाचवू. त्या युगात प्रवेशण्यासाठी आपण “आतूर’ आहोतच; पण “बिनघोर’ आहोत का, हा प्रश्‍न महत्त्वाचा!

Leave A Reply

Your email address will not be published.