नवी दिल्ली : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड यांचा पोलीस कोठडीत मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच आता भारतातही तामिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यात असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
तामिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यात वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांवर अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. तामिळनाडूमध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या घटनेचा निषेध केला आहे. प्रसारमाध्यामांच्या वृत्तानुसार पिता-पुत्र दोघांना पोलीस कोठडीत अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
पी. जयराज (५९) आणि जे. फेनिक्स अशी या मारहाणीत म्रुत्युमुखी पडलेल्या दोघांची नावं आहेत. १९ जून रोजी लॉकडाउन दरम्यान मोबाइलचे दुकान सुरु ठेवले म्हणून चौकशीसाठी त्यांना साथाकुलम पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोठडीत पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
फेनिक्स आजारी पडला व कोविलपत्ती जनरल हॉस्पिटलमध्ये २२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला व त्याच्या वडिलांचा २३ जून रोजी मृत्यू झाला. पोलिसांच्या या अमानुषतेचा राज्यभरातून निषेध होत असून चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षकाची बदली झाली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.