अहमदाबाद – अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. जीप आणि डंपर यांच्यात धडकल्यानंतर तेथे उभ्या असलेल्या लोकांना कारने चिरडले. मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे.
सरखेज-गांधीनगर महामार्गावरील इस्कॉन पुलावर दोन वाहनांची टक्कर झाल्यानंतर लोकांचा जमाव जमला होता. त्याच वेळी भरधाव वेगात असलेली आलिशान कार या गर्दीवर आदळली, त्यात नऊ जण ठार झाले, तर अन्य 13 जण जखमी झाले. ही कार 100 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने धावत असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये बोटाड आणि सुरेंद्रनगर येथील नागरिकांचा समावेश आहे.