मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी फाटा ते पारगाव रस्त्यावर अवसरी खुर्द गावाच्या हद्दीत उसाचा ट्रक व स्कार्पिओ गाडीची रविवार (दि.19) रोजी सायंकाळी समोरासमोर धडक झाली. या अपघातात खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी स्कार्पिओ गाडीत होते.
प्राजक्ता प्रदीप ठाकूर (वय २७), ज्ञानदा प्रदीप ठाकूर (वय ३ सर्व रा.ठाकूर पिंपरी ता.खेड), चालक संतोष सोपान पवार (वय ४०), अपर्णा संतोष पवार (वय ३६), अदिती संतोष पवार (वय.१० सर्व रा.निघोजे ता.खेड) अशी जखमींची नावे आहेत.
हे सर्वजण पिंपळगाव खडकी येथील त्यांचे जवळचे नातेवाईक सेवानिवृत्त ज्ञायाधीश देवराम अरगडे यांच्याकडे गेले होते. पाहुणचार घेतल्यानंतर ते स्कार्पिओतून (एम.एच १४ डी.एन ८५५६) निघोजे गावाकडे जात होते. त्याचवेळी पश्चिम बाजूने ऊस वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.०४ एफ ७७२५) समोरून आला. दोन्ही वाहनांची समरसमोर धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघात स्थळापासून जवळच राहणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिवराज भोर, संदीप भोर, बाळासाहेब भोर, गौरव भोर, अर्जुन काजळे, विलास काळे, विकास भोर मदतीसाठी धावून आले. त्यांनी स्कार्पिओमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना मंचर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गणेश शिंदे व गौरव बारणे ह्या रुग्णवाहिका चालकांनी दाखल केले आहे. पळून गेलेल्या ट्रकचालकाचा शोध पोलीस घेत आहेत. दोन्ही वाहनांच्या अपघातामुळे वाहतूक बंद पडली होती. भोरमळ्यातून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली होती. मंचर पोलीस पोलीस पुढील तपास करत आहेत.