नवी दिल्ली – आपल्या न्यायालयांमधील बहुतांश युक्तिवाद हे बार आणि खंडपीठ यांच्यातील संवाद असतात. बोलताना एखाद्याला रोखले जाते, विनोद केला जातो, गंभीर वाद घातला जातो वगैरे वगैरे, हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी व्यक्त केलेले मत म्हणजेच त्याअनुषंगाने निकाल दिला जाण्याचे संकेत नाहीत, असे मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सरन्यायाधीश चंद्रचूड हे बोलत होते. न्यायालयांमध्ये दोन प्रकारचे न्यायाधीश असतात. एक जे विरोधी मत व्यक्त करत वकिलांना प्रोत्साहित करतात, तर दुसरे युक्तिवाद वाढवून तार्किक निष्कर्षापर्यंत नेतील. अशा वेळी न्यायाधीशांद्वारे व्यक्त केले जाणारे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर जाते. तेव्हा न्यायाधीश असा विशिष्ट निर्णय घेतील, असा निकर्ष लोकांना वाटू लागतो; जे प्रत्यक्षात वास्तव नसते. शेवटचा युक्तिवाद होत नाही, तोपर्यंत खटल्याचा निर्णय होत नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
तसेच असे अनेक खटले आहेत, जिथे कदाचित युक्तिवादाच्या शेवटच्या क्षणी मी माझी मते बदलली आहेत. कारण युक्तिवादाच्या शेवटी काहीतरी अतिशय परिणामकारक मुद्दा मांडला गेलेला असतो. खुल्या सुनावणीत असे घडते, असे सांगून सरन्यायाधीश म्हणाले की, मौन बाळगणाऱ्या न्यायाधीशांची भीती वाटत असल्याचे वकील सांगतात. कारण न्यायाधीश शांत बसलेले असतील आणि त्यांना काय वाटते, हे जर सांगत नसतील तर न्यायाधीशाच्या मनात नेमके कोणते विचार सुरू आहेत, हे समजत नाही. पण सोशल मीडिया कधी-कधी हे गृहित धरत नाही किंवा नागरिकांनाही याची कल्पना नसते. मी त्यांना दोष देत नाही. ही प्रणाली जेवढी खुली ठेवाल, तेवढ्या प्रमाणात लोकांना न्यायालयीन प्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे समजेल, असेही त्यांनी सांगितले.
Maharashtra : भाजप-राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा एकत्र हवाई प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
समाजमाध्यमांचा दबाव असतोच…
सोशल मीडिया हे केवळ तंत्रज्ञान नसून काळाची निर्मिती आहे. आपण आता सोशल मीडियाच्या युगात जगत असून ज्यात सार्वजनिक संस्थांबद्दलचा अविश्वास वाढला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. माझे स्वत:चे ट्वीटर हॅण्डल नाही. कारण ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या आक्रमक दृष्टिकोनाच्या प्रभावाखाली न येता, त्यापासून दूर राहणे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे असते. परंतू, जेव्हा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना व त्यातील शब्द न् शब्द ट्विट करत राहिल्याने त्याचा आपसूकच न्यायाधिशांवरही दबाव राहतो, असेही मत सरन्यायाधीशांनी यावेळी व्यक्त केले.