पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परवानगीशिवाय फॅशन स्ट्रीट येथील व्यावसायिकांनी दुकाने खुली केली होती. मार्केटमधील या अनधिकृतपणे सुरू असलेल्या काही दुकांनावर बोर्डाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई केली आहे. यावेळी दुकानांना बंदीचे आदेश बोर्डाकडून देण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमुळे बोर्डातील सर्व बाजारपेठा मार्च महिन्यापासून बंद होत्या. जूनमध्ये लॉकडाऊन नियमात शिथिलता देत, हदीतील काही दुकाने आणि शिवाजी मार्केट ही बाजारपेठ खुली करण्यास बोर्डाने सशर्त परवानगी दिली. मात्र, फॅशन स्ट्रीट, कुंभारबावडी यासारख्या बाजरपेठा खुल्या करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. यासंदर्भात व्यावसायिकांनी सातत्याने निवेदने देऊनही, त्यासंदर्भात कोणताही निर्णय बोर्डाने घेतला नाही. परिणामी, व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले.
बोर्डाकडून परवानगीबाबत होणाऱ्या दुर्लक्षामुळे फॅशन स्ट्रीट मार्केटमधील काही व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने सुरू केली. तसेच, सुरक्षितततेच्या नियमांचे योग्यप्रकारे पालन होईल यासाठी खबरदारी घेतली. मात्र, विनापरवानगी सुरू केलेल्या या दुकानांवर बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (दि.18) कारवाई केली. तसेच व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले.