युरियासोबत अन्य खते खरेदीची शेतकऱ्यांना सक्‍ती

संग्रहित छायाचित्र

अवसरी – आंबेगाव तालुक्‍यातील काही खत विक्रेते दुकानदार युरिया खताबरोबर दुसरे खत विकत घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना करीत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. तालुका कृषी विभागाने याबाबत लक्ष घालावे अशा दुकानदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या महिन्यात आंबेगाव तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक शेतकरी आपापल्या शेतात पिके घेण्यासाठी तयारी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतात घेतलेल्या पिकांना खते देण्याची लगबग सध्या सुरू आहे; परंतु आंबेगाव तालुक्‍यात काही दुकानदाराकडे शेतकरी युरिया खत खरेदीसाठी गेले असता, युरिया खताच्या गोणी बरोबरच दुसरी खते घेण्याची जबरदस्ती काही दुकानदार करीत आहेत. किंवा दुसरे खत खरेदी केल्यासच युरिया खत मिळेल अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. त्यामुळे तीनशे रुपयाच्या खतांच्या गोणीबरोबरच दुसरी सुद्धा खताची गोणी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक सध्या गरज नसलेले खताची खरेदी करावी लागत आहे. सध्या शेतपिकासाठी युरिया खताची जास्त मागणी आहे. शेतकऱ्यांना ती वेळेवर मिळतील का नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. खतविक्री दुकानदारांनी शेतकऱ्यांची अशी अडवणूक केली तर शेतकऱ्यांनी काय करायचे? असा प्रश्‍न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे. याकडे आंबेगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी
केली आहे.

खतनिर्मिती कारखाने अगर डिस्ट्रिब्युटर दुकानदारांना युरिया घेण्याबरोबरच इतर खते जबरदस्तीने घेण्याची सक्ती करतात. त्या मुळे आम्हाला नाईलाजास्तव ती खते खरेदी करावी लागतात.
-एक दुकानदान, (नाव न छापण्याच्या अटीवर)


युरिया खताबरोबर दुसरी खते घेण्याची सक्ती कोणताही दुकानदार करू शकत नाही. असे आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अशा दुकानदारांचा परवाना रद्द करून खताचा साठा सील केला जाईल.
-टी. के. चौधरी, आंबेगाव तालुका कृषी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)