नगर – नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी शिवारात झालेल्या बेकायदा गौणखनिज उत्खननाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिले आहेत. यासाठी सहा जणांचे विशेष पथक नेमले असून लवकरात लवकर अहवाल सादर करणार आहेत.
वडगाव गुप्ता येथील राधाबाई ढेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 15 जून 2019 रोजी गौणखनिज उत्खननाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी नगर तहसीलदारांना पत्र पाठवून, संबंधित मंडलाधिकारी, तलाठी तसेच भूमिअभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींचे पथक तयार करून संबंधित गौणखनिज उत्खनन जागेचे पंचनामे व मोजमाप करताना तेथे अनधिकृत उत्खनन सुरू आहे की नाही, याची शहानिशा करण्याचे व संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई करून अहवाल देण्याचे स्पष्ट केले होते.
यात तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार, नगर तालुक्याच्या भूमि अभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता, सावेडीचे मंडलाधिकारी तसेच वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी गावांचे तलाठी यांचा समावेश आहे.