पुणे – कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून (दि.21) दोन सत्रामध्ये सुरू झाले आहे. सर्व पाच न्यायालये सुरू असून, सकाळच्या सत्रामध्ये तीन आणि दुपारच्या सत्रामध्ये दोन न्यायालयाचे कामकाज चालणार आहे.
करोनामुळे सहा महिने न्यायालयीन कामकाजांवर परिणाम झाला आहे. आता ते दोन सत्रामध्ये सुरु झाल्यामुळे वकील वर्गाला दिलासा मिळाला. मार्चपासून केवळ तातडीच्या दाव्यांवरच सुनावणी सुरू होती. जुनच्या सुरुवातीला दोन सत्रांमध्ये न्यायालय सुरू झाले. त्यानंतर कामकाज पुन्हा एका सत्रामध्ये केले होते. आता पुन्हा दोन सत्रात सुरू झाले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार करोना काळात न्यायालयीन कामकाज करताना काय काळजी घेण्यात यावी, याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयात येणाऱ्या वकील, पक्षकारांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर नियमाचे पालन करावे, असे आवाहन दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा ऍड. वैशाली चांदणे यांनी केले.
पोटगी, मुलाच्या ताब्याची आणि भेटीची प्रकरणे, परस्पर संमतीने घटस्फोट खटले यामध्ये साक्षी पुरावे नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रकरणे लवकर निकाली काढण्यास प्राधान्य राहील. अंतरिम अर्जाची सुनावणी प्रत्यक्ष किवा लेखी युक्तिवादाद्वारे घेतली जात आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही सुनावणी सुरू आहे, अशी माहिती फॅमिली कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी दिली.