पुणे – शिवाजीनगर न्यायालयाबरोबरच कौटुंबिक न्यायालयाचे कामकाजही आठ जून पासून सुरू होणार आहे. दोन सत्रात सुरू होणार आहे. पहिल्या सत्रात तीन आणि दुसऱ्या सत्रात दोन न्यायालये सुरू असणार आहेत.
न्यायालयात दाखल होणारे दावे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. लॉकडाउन आणि सुरक्षित अंतर याचा नियम लक्षात घेऊन न्यायाधीशांनी आणि वकिलांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगचा वापर वाढवावा, असे सूचित करण्यात आले आहे. कौटुंबिक न्यायालयाचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे. सकाळी साडेदहा ते दीड आणि दुपारी अडीच ते साडेपाच यावेळेत काम चालणार आहे. एका सत्रात 15 टक्के कर्मचारी उपस्थितीत असणार आहेत. परस्परसंमतीच्या दाव्यांमध्ये साक्षीदार आणि कागदपत्रांची पडताळणी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात यावी.
न्यायाधीशांना निकाल सुनावणीच्या टप्प्यात असलेल्या दाव्यांना प्राधान्य देता येईल. दाव्यांमधील अंतिम युक्तीवाद व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे, लेखी युक्तीवाद स्वरुपात घेता येईल. नवीन दावे दाखल करण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या इमेल वर मेल करावा. त्यानंतर वकिलांना तारीख आणि न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची वेळ कळविली जाईल.
न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या डेस्कवर सर्टिफाईड कॉपीचे अर्ज दुपारच्या सत्रात स्वीकारले जातील, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ज्या वकिलांचे आणि पक्षकारांचे काम आहे त्यांनाच न्यायालयात प्रवेश दिला जाईल. इतरांनी विनाकारण येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. वकिलांच्या बार रुम, माहिती देणारे किऑस्क, चाइल्ड केअर सेंटर हे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे.