तातडीने गरज असल्याचे सांगून मागितली आर्थिक मदत
पुणे – शहरातील नामांकित वकिलांच्या नावाने अकाऊंट उघडून आर्थिक मदत मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या वकिलांच्या एका मित्राने त्यावरील मेसेज पाहून 35 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, इतरांनी फोन करून आर्थिक मदतीची गरज आहे का, विचारणा केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत ऍड. विजयसिंह निकम यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.
ऍड. निकम यांच्या नावाचे बनावट अकाऊंट उघडून त्यांच्या मित्रांना फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तातडीने पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवले. ज्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले, ते खाते दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असल्याचे निष्पन्न झाले.
फेसबुकवरील प्रतिष्ठित नागरिकांच्या नावाने बनावट अकाउंट काढून, त्यांचे फोटो ठेवून अशाप्रकारे पैसे मागून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार सध्या वाढला आहे. वकील, डॉक्टरांबरोबरच बिल्डर आणि इतर व्यावसायिकांच्या नावानेही बनावट खाते उघडण्यात येत आहेत. माझ्या ओळखीच्या आणखी एका व्यक्तीबाबत असे घडले होते.
– ऍड. विजयसिंह निकम