पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा रविवार (दि. 5) चिंचवडमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाल्याने हा मेळावा रद्द करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचा शुक्रवारी मेळावा झाल्यानंतर रविवार (दि.5) भाजपकडून चिंचवडमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विरोधी पक्षनेते फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासह शहर भाजपने मेळाव्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शनिवारी ताप आल्याने सोलापूर दौरा सोडून ते मुंबईला रवाना झाले होते. त्यानंतर त्यांची करोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील भाजपचा मेळावा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.