पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शुक्रवार (दि.3) रोजी चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात पदवाटप आणि कार्यकर्ता मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
दादांनी केलेल्या चौफेर टोलेबाजीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी चिखलीत बैलगाडा शर्यतीचे केलेले आयोजन आणि मोठ्या रकमेची बक्षीसे देऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजप वगळता शहरातील इतर राजकीय पक्षांत काही प्रमाणात शांतता दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या विधानसभा आणि 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या बालेकिल्याचे बुरूज ढासळले. अन् 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदार संघात पराभव झाला. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आता काही खरे नाही, अशी भावना जनसामान्यांत होऊ लागली होती.
त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराकडे दुर्लक्ष केल्याची चर्चाही होऊ लागली होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरीमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला अन् अण्णा बनसोडे यांचा विजय झाला. त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याने नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले.
विकासकामांचे उद्घाटन अन् यशस्वी मेळावा
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात केलेल्या विकास कामांचे उद्घाटने आणि भूमिपूजने उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुक्रवार (दि.3) रोजी झाली. दादांचा सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा ठिक-ठिकाणी मोठी गर्दी आणि उत्साह दिसून आला. त्यानंतर दुपारी चिंचवड येथे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या मेळाव्यासाठी संपूर्ण सभागृह खचाखच भरून गेले होते. या मेळाव्यात दादांनी तब्बल एक तास भाषण देऊन शहर विकासासाठी आपण आत्तापर्यंत काय-काय केले याचा ऊहापोह कार्यकर्त्यांसमोर केला. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना चांगलेच चार्ज करून गाफील न राहण्याच्या सुचना दिल्या. राष्ट्रवादीचे 100 नगरसेवक निवडून द्या असे म्हणत आगामी महापालिका निवडणुकीसाठीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
भाजपकडूनही निवडणुकीची तयारी
भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी जाधववाडी-चिखली येथे सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीचे चार दिवस आयोजन केले. या शर्यतीला राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांनी लावलेली हजेरी आणि शर्यतीसाठी ठेवलेल्या बक्षीसांवरून शहर आणि परिसरात भाजपची मोठी चर्चा झाली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण आता खऱ्या अर्थाने तापू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.