मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक पार पडत असून अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसून आले.
शरद पवार यांनी आपल्या छोटेखानी भाषणामध्ये सासर हे शिंदे होते आणि ते उत्तम क्रिकेटर होते असा संदर्भ मिश्कीलपणे दिला. माझे सासरे शिंदे होते म्हणून शिंदेंनी आपल्या जावयाची काळजी घ्यावी असा मिश्कील टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लवगला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तितक्याच मिश्कीलपणे उत्तर दिले. “माझे सासरे शिंदे होते,” असं पवारांनी हातवारे करुन म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
दरम्यान, पवारांच्या या गुगलीवर फडणवीस यांनी अगदी त्याच पद्धतीने टोला लगावत सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं असा सवाल विचारताच सभागृहात पुन्हा हशा पिकला. “आताच पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकली आहे. ती जबाबदारी टाकताना मुख्यमंत्र्यांना असे बांधलेले आहे. सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं?” असे फडणवीस यांनी हसतच विचारले.