मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक दिग्गज कार्यकर्ते शिंदे गटात निघून गेले. अगदी त्याचप्रमाणे ठाकरे गटामध्ये काही नव्या चेहऱ्यांनी प्रवेश केल्याचे देखील पाहायला मिळाले. ज्यात प्रामुख्याने सुषमा अंधारे यांचं नाव घेतलं जात. अंधारे यांनी अल्पावधीतच उद्धव ठाकरे गटात आपण स्थान निर्माण केलं. मात्र यामुळे अनेक दिवसांपासून पक्षात कार्यरत असणाऱ्या दीपाली सय्यद या बॅकफुटवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. सय्यद या आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले. आता सय्यद यांनी स्वतः शिंदे गटात जाण्याबाबत खुलासा केला आहे.
एका वृत्तवाहिनीने दीपाली सय्यद यांना तुम्ही नेमकं कोणत्या गटात आहात ? असा सवाल विचारला असता त्या म्हणाल्या,”मी सध्या शिवसेनेत आहे,’वेट अँड वॉच’, सय्यद यांच्या या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी सध्या लोकांची कामे करतीय,बोलण्यासोबतच काम करणंही गरजेच असत सतत टीव्हीवर येऊन तू तू मै मै करणं गरजेचं नाही असंही सय्यद यावेळी म्हणाल्या.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दीपाली सय्यद यांनी दोन्हही गटांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नव्हते. आता वेट अँड वॉच म्हणत त्यांनी सस्पेन्स आणखी वाढवला आहे. त्यामुळे त्या आता नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.