फेसबुकचे नवीन फीचर; ५० जणांना करता येणार एकत्र व्हिडिओ कॉल

नवी दिल्ली : लॉकडाउनमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या झूम अॅपला टक्कर देण्यासाठी फेसबुकने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुकने एक नवीन व्हिडिओ चॅटिंग फीचर ‘Messenger Rooms’ रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. याद्वारे एकाचवेळी ५० जणांना व्हिडिओ कॉल करता येणे शक्य आहे.

या फीचरद्वारे युजर्स स्वतः चॅट रूम्स तयार करु शकणार आहेत. ‘Messenger Rooms’ हे फीचर फेसबुक मेसेंजरमध्येच क्रिएट करण्यात आले आहे. म्हणजे, फेसबुकच्या मेसेंजरमध्येच युजर्सना ‘Messenger Rooms’हे फीचर मिळेल. या फीचरमुळे मेसेंजरद्वारे एकाचवेळी ५० जणांना व्हिडिओ कॉल करता येईल.

विशेष म्हणजे ज्यांचे फेसबुक अकाउंट नसेल असे युजरही व्हिडिओ चॅटिंग रुम जॉइन करु शकतील, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. एखादी चॅट रुम किती वेळ सुरू असेल यावरही काही काही मर्यादा नसेल. मेसेंजर रुम होस्ट करणाऱ्याकडे सर्व कंट्रोल्स असतील आणि आवश्यकतेनुसार तो युजर रूम लॉक किंवा अनलॉक करेल. रुम तयार करणाऱ्या युजरकडे कोणाला जॉइन करुन घ्यावं याचा पर्याय असेल.

याशिवाय, होस्ट युजरकडे कोणत्याही सभासदाला रुममधून काढून टाकण्याचाही पर्याय असेल. ज्याप्रमाणे फेसबुक मेसेंजरवर ग्रुप बनवला जातो, त्याचप्रमाणे Messenger Rooms क्रिएट करता येईल. शुक्रवारपासून Messenger Rooms हे फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांमध्ये सर्व युजर्सना हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.