पुणे-पुरंदर तालुक्यात करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर, कोविड आरोग्य तपासणी केंद्र वाढवावेत तसेच कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची प्राधान्याने आरोग्य तपासणी करावी. करोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा अत्यंत काटेकोरपणे शोध घेणे आवश्यक आहे. तसेच संस्थात्मक विलगीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सासवड तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, जेजुरीचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने, सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळत, जेजुरीचे मुख्याधिकारी पूनम शिंदे, निवासी नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे, नायब तहसीलदार उत्तम बडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले की, सासवड, जेजुरी शहरासोबतच ग्रामीण भागातील करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच संस्थात्मक विलगीकरण, करोना चाचणी व करोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच गावपातळीवर बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना तसेच करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. तसेच होम आयसोलेशनबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबाला माहिती देण्यासोबतच करोनाबाबत दक्षता घ्या, घाबरू नका, असा सल्ला द्या, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांच्यावर कडक कारवाई करा
करोना संसर्गाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी गावनिहाय नियोजन करून जनजागृतीसाठी ध्वनीफित असणारे फिरते वाहन गावात पाठवा तसेच मास्क न वापरणे, लग्नसमारंभात नियमापेक्षा अधिक संख्या तसेच अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, या कारवाईसाठी भरारी पथक तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
अत्यावश्यक सेवा व इतर महत्त्वाच्या कामाशिवाय अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वॉर्डनिहाय करोना संसर्ग रोखण्याच्या मदतीसाठी पाच स्वयंसेवकांची नेमणूक करणार असून सर्व नियमांचे पालन केले तर करोनाचा संसर्ग रोखण्यात यश येईल.
– संदीप पाटील, पोलीस अधीक्षक