‘पीक विमा भरण्यास महिनाभर मुदतवाढ द्या!’

मुुंबई – खरीप हंगामातील पीक विमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पीक विमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्या, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्याच्या अनेक भागात अजून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक भागात खरीप हंगामाच्या पेरण्या कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा पेरा 50 टक्केही झालेला नाही तर काही भागात पेरण्याचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे. समाधानकारक पावसाअभावी शेतकरी संकटात आहे. तसेच पीक कर्जाचे वाटपदेखील सध्यस्थितीत 50 टक्‍क्‍यांहून कमी झालेले असल्यामुळे पीक विमा हप्ता भरण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. राज्यातील लाखो शेतकरी अजनूही पीक विम्याचा हप्ता भरण्यापासून वंचित आहेत. जुलै महिन्याअखेरीस पीक विमा भरण्याची मुदत संपत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही हे लक्षात घेऊन त्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून द्यावी, अन्यथा मोठ्या संख्येने शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहतील, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

विदर्भात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भात (धान) उत्पादक शेतकऱ्यांसाठी पिक विमा हा फक्त धानपिकाची लावणी झाल्यानंतरच स्वीकारला जातो. रोपे टाकल्यानंतर पीक विमा लागू करणे आवश्‍यक असताना धान (भात) या एकमेव पिकासाठी हा जाचक नियम लावल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने लाभापासून वंचित रहात आहेत. हा निकष बदलावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.