देशात केवळ 8 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये तफावत
नवी दिल्ली : 17 व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीनवरून मोठा गोंधळ झाला होता. तसेच संशयाला वाव राहू नये म्हणून 50 टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या पडताळणीबाबत महत्वाची माहिती उघड झाली आहे. संपूर्ण देशभरात करण्यात आलेल्या मतांच्या पडताळणीत केवळ 0.0004% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांमध्ये फरक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संपूर्ण देशात केवळ 8 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये अंतर असल्याचे दिसून आले. मेघालयमधील शिलॉंग मतदारसंघातील एका मतदान केंद्रातील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये 34 मतांचे अंतर दिसून आले. देशभरात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील हा सर्वात मोठा फरक ठरला आहे. आंध्र प्रदेशमधील राजमपेट मतदान केंद्रात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सात मतांचा फरक दिसून आला. हिमाचल प्रदेशमधील शिमला येथील एका मतदान केंद्रातील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एका मताचा फरक दिसून आला. राजस्थानमधील चित्तौडगड आणि पाली लोकसभा मतदारसंघातील एकेका मतदान केंद्रात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये एका मताचा फरक दिसून आला. मणिपूरमध्ये दोन ठिकाणी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक दिसून आला. यातील एका ठिकाणी एक तर दुसऱ्या ठिकाणी दोन मतांचा फरक होता. दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक का दिसून आला याचा तपास करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.