भवानीनगर -एलसीडी टीव्हीचे हप्ते घेण्यासाठी घरी बोलावून एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या खटल्यातून एका आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे. बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी नुकताच हा निकाल दिला. आरोपीच्या वतीने ऍड. विशाल विजयराव बर्गे यांनी कामकाज पहिले. संग्राम रणधीर भोसले असे मुक्तता झालेल्याचे नाव आहे. बारामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव मोहिते यांनी या प्रकरणाचा तपास केला.
याबाबत विवाहित महिलेने 2 मे 2017 रोजी बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पीडितेच्या जावयाने बारामती येथील एका इलेक्ट्रॉनिक दुकानातून मासिक हप्त्यांवर एलसीडी टीव्ही घेतला होता. त्याचा मासिक हप्ता घेण्यासाठी आरोपी भोसले याने घरी बोलावले आणि घरात विनयभंग केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता.
याप्रकरणी बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. आर. वाघोले यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. पीडितेने केलेले आरोप, सादर केलेले पुरावे व तिचा पती, मुलगी आणि जावई यांनी दिलेली साक्ष न्यायालयात टिकू शकली नसल्याने न्यायधीश पी. आर. वाघोले यांनी आरोपीची या खटल्यातून मुक्तता केली आहे.