पुणे – “सीबीएसई’च्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या तारखा दि. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी “ट्विट’करून दिली.
करोना पार्श्वभूमीवर “सीबीएसई’ दहावी व बारावीचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या “ट्विट’नंतर चित्र स्पष्ट झाले आहे.
देशभरातील शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधताना पोखरीयाल यांनी परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. करोनामुळे बोर्डाने परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे.
परंतु, यावेळी करोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य पद्धतीने पाळल्या जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही. 2021 साठीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाइन नसून लेखी स्वरुपाच्या असणार आहेत, असेही स्पष्ट केले आहे.