चांदखेड, (वार्ताहर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयात दहावी बोर्ड परीक्षेचे केंद्र आहे. बोर्ड परीक्षा शुक्रवारपासून (दि. १) सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यालयामध्ये परीक्षा पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. या केंद्रावर चांदखेड, सोमाटणे, परंदवडी, बेबळओहोळ, साळुंब्रे ,दारुंब्रे, आढले खुर्द व आढले बुद्रुक आदी आठ शाळांचे एकूण ४०७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.
या केंद्रावर परीक्षेच्या नियोजनाबाबतची या शाळांच्या मुख्याध्यापकांची व परीक्षेसाठी पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांची सभा झाली. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात, तसेच यावर्षी बोर्डाने विद्यार्थ्यांना दहा मिनिट जास्त वेळ दिलेला आहे, असे केंद्र संचालक व विद्यालयाचे मुख्याध्यापक अजिनाथ ओगले यांनी सांगितले.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खासगी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यालयात दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून त्याचीही सभा आहे
.विद्यार्थ्यांना लागणारे आवश्यक सर्व साहित्य केंद्रावर उपलब्ध झाले आहे. शाळा व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला असून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी तालुक्यातील सर्व केंद्र संचालकांची सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.