राजगुरूनगर (पुणे) -खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे (सुपेकर) यांनी वयाच्या 60व्या वर्षी पत्रकारितेची परीक्षा देऊन 90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
सतीश चांभारे हे कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे सेवेतून दीड वर्षापूर्वी 33 वर्षांचे सेवापूर्तीनंतर नियत वयोमानानुसार सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले. शिक्षणाची आवड, कठोर परिश्रम करण्याची जिद्द, चिकाटी, प्रगल्भ आत्मविश्वास, अभ्यास करण्याची वृत्ती असल्याने त्यांनी सेवानिवृत्तीनंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे पुणे येथील अविनाश धर्माधिकारी यांचे चाणक्य मंडळ या केंद्रात वृत्तपत्रविद्या व जनसंपादन (पत्रकारिता) पदविका या एक वर्षाचे शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतला होता.
या परीक्षेचा निकाल विद्यापीठाकडून नुकताच जाहीर झाला असून चांभारे ही परीक्षा 90 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाले. चांभारे यांनी यापूर्वी एमकॉम, एचडीसी डीसीएम, जीडीसी अँड ए या पदव्या संपादन केलेल्या आहेत. शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे यावरून दिसून येते. वयाच्या साठाव्या वर्षी चांभारे यांनी हे यश संपादन केलेने त्यांचे तालुक्यात सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.