नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांच्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये पहिला झटका बसला आहे. पक्षाचे जालंधर येथील खासदार सुशील कुमार रिंकू यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या उपस्थितीत रिंकू भाजपमध्ये दाखल झाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या कॉंग्रेस खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यावर गेल्या वर्षी त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
त्यात आपकडून रिंकू मोठ्या मताधिक्क्योन विजयी झाले होते. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही मोठा हादरा मानला जातो आहे.
विशेष म्हणजे कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची देशभरात आघाडी झाली असली तरी पंजाबमध्ये या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आम आदमी पार्टीने पुन्हा रिंकू यांनाच जालंधर येथून उमेदवारी दिली होती. आता ते भाजपत दाखल झाल्यामुळे आपला नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे.