पुणे – लग्न जमविताना लपविलेले मुला-मुलीचे आजारपण, असलेले दोष लग्नानंतर वादाला कारण ठरत आहेत. यावरून निर्माण झालेले वाद थेट न्यायालयात पोहोचत आहेत. नुकताच असा एक धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीचा बुद्ध्यंक कमी असतानाही तिचे लग्न लावून देण्यात आले. मात्र पत्नी सुज्ञ नसल्याचे लक्षात आल्याने पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला. क्रुरतेच्या आधारावर दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात न्यायालयाने पतीला पत्नीपासून घटस्फोट मंजूर केला आहे. या प्रकरणातील दांपत्याचा संसार दोन वर्षात संपुष्टात अला.
राजा आणि राणी (नावे बदललेली) अशी दोघांची नावे आहेत. जुलै 2021 मध्ये दोघांचा विवाह झाला. त्यांना मूलबाळ नाही. राणी यांना घरातील कोणतीही कामे जमत नसल्याचे लग्नाच्या काही दिवसानंतर राजा यांच्या लक्षात आले. समजावून सांगितले तरी राणी त्याच चुका पुन्हा-पुन्हा करीत. एक दिवस राणी यांनी घरातील गॅस सुरू ठेवला होता. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर गॅस बंद करण्यात आला.
सातत्याने छोट्या-छोट्या चुका करीत असल्याने राजा यांनी राणी यांची बुद्ध्यंक चाचणी करून घेतली. त्यातून राणी या सुज्ञ नसून त्यांना बऱ्याच बाबी कळत नसल्याचे निदर्शनात आले. पत्नी सुज्ञ नसल्याचे लक्षात आल्यानंतर राजा यांना मोठा धक्का बसला. राणी यांच्या उपचारासाठी आई-वडिलांची आवश्यकता होता. मात्र तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या उपचारासाठी येण्यास नकार दिला. दरम्यान त्यांनी पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी ऍड. रितेश भूस्कडे यांच्यामार्फत येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यात पत्नी हजर झाली नाही. तिने तिची कैफियत मांडली नाही. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी आदेश दिला. पत्नीने राजा यांना क्रुरतेची वागणूक दिली. त्यामुळे ते घटस्फोट मिळण्यास पात्र आहे, असे नमूद करीत न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. याविषयी ऍड. रितेश भुस्कडे म्हणाले, मुलगी सुज्ञ नसल्याचे माहिती असताना तिचे लग्न लावून देण्यात आले. त्याचा पतीला त्रास सहन करावा लागला. तपासणीद्वारे ती सुज्ञ नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यातील क्रुरतेच्या कलमानुसार घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.