पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहा महिन्यांनंतर घराबाहेर पडत आहेत. मुख्यमंत्री यांनी जनतेत जाऊन धीर देणं गरजेचं होतं. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पिंजून काढलं. त्यामुळे लोकांना आजही मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस असल्याचं वाटतं, असे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (30 जुलै) गुरुवारी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री पुणे जिल्हा आणि विभागाचा कोरोनाचा आढावा घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ दिखाव्यासाठी असल्याचा आरोप जगदीश मुळीक यांनी केला आहे.
जगदीश मुळीक म्हणाले, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे राज्य सरकारकडून भेदभाव केला जात आहे. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 200 कोटींचा खर्च केला. मात्र राज्य सरकारने केवळ तीन कोटी रुपयांची मदत केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकीचं नाटक न करता 500 कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील मुळीक यांनी केली आहे.