मुंबई – विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ पराभूत झाला असला तरीही त्यांचे कौतुक करायलाच हवे. त्यांनी या संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व राखले केवळ अंतिम सामन्यात त्यांना यश मिळाले नाही. परंतु त्यावरून खेळाडूंवर, कर्णधारावर ज्या पद्धतीने टीका सुरू झाली आहे ती थांबली पाहिजे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.
एका पराभवाने कोणत्याही संघाचा दर्जा किंवा खेळाडूंच्या कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. रोहितने अत्यंत प्रभावीपणे संघाचे नेतृत्व केले. इतकेच नव्हे तर सहकारी खेळाडूंनीही आपल्या क्षमतेच्या जास्त सरस कामगिरी केली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ जास्त सरस खेळला पण तरीही भारतीय संघावर टीका करण्याचे कारण नाही, असेही गावसकर म्हणाले.
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेल्या रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 240 धावांत गुंडाळले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 6.6 षटकांत 47 धावांवर 3 विकेट गमावल्या. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी 215 चेंडूत 192 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय एकतर्फी ठरला. या काळात हेडने आक्रमक फलंदाजी केली, तर लॅबुशेन संथ गतीने डावाची धुरा सांभाळताना दिसला. हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 137 धावा केल्या होत्या. याशिवाय लॅबुशेनने 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
टीम इंडियानं विश्वचषक फायनलचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना 6 विकेटने गमावला. या पराभवानंतर करोडो भारतीय क्रिकेट चाहते दु:खी तर होतेच, पण टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर निराशाही दिसत होती. रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज मैदान सोडतानाही रडले.