तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषद शहरातून दररोज सुमारे २२ टन ओला-सुका कचरा गोळा करते. या कामासाठी २२० कर्मचारी काम करतात. नगरपरिषद यावर सुमारे ७० लाख रुपये दरमहा खर्च करते. असे असुनही शहर शंभर टक्के कचरामुक्त होताना का दिसत नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
तळेगाव शहराची लोकसंख्या एक लाखाच्या आत आहे. कचरामुक्त शहरासाठी नगरपंचायतीचे सर्व अधिकारी यंत्रणेवर लक्ष ठेवून असतात. स्वच्छतेच्या कामासाठी नगरपरिषदे कडून ठेकेदारांची नेमणूकही केलेली आहे.
यासाठी नगरपरिषदेला प्रत्येक महिन्याला सुमारे ७० लाख रुपयांचा खर्च येत आहे. तरीदेखील नागरिकांच्या तक्रारी का येत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातून २२ टन घनकचरा गोळा होत असून त्यातील १२ टन ओला तर १० टन सुका कचरा असतो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया तयार झालेले खत पाच रुपये किलो दराने विकले जाते.
आकडे बोलतात…
घंटागाड्या – २०
ट्रॅक्टर ८
मदतनीस ३६,
साफसफाई कर्मचारी १००
उद्यान स्वच्छता कर्मचारी २०
ओला-सुका कचरा प्रक्रिया कर्मचारी १०
औषध फवारणी, शौचालय सफाई ९
इतर सफाई कर्मचारी १७