पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यार्थ्यांनो यशस्वी व्हायचं असेल, तर स्वतःला शिस्त लावा. न्यूनगंड बाळगू नका. स्वतःमधील ‘स्व’ला ओळखा. छोट्या छोट्या संकटांना घाबरून मागे राहू नका. निर्णय कोणताही घ्या चूक असो वा बरोबर; पण निर्णय घेण्याचे प्रयत्न आणि धाडस सतत केले पाहिजे.
यातून आयुष्यात आपल्याला स्वतःवर संयम राखता येईल आणि स्वतःवर ताबा ठेवता येईल. यासाठी स्वतःमध्ये बदल घडवायला शिकले पाहिजे. स्व आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आव्हाने स्वीकारा, असे मत उद्योजक संजय घोडावत यांनी व्यक्त केले.
खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. या वेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, राजेश भुतडा,
फेंगसे, टिळेकर, रमेश अवस्थे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डॉ. अर्जुन मुसमाडे यांसह महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
संघर्षातून मोठे व्हा आणि आयुष्याच्या भव्यदिव्य स्वप्नांना गाठा. यासाठी सतत मोठी स्वप्न पाहा, तरच आयुष्यात खूप मोठे व्हाल, असा संदेश कृष्णकुमार गोयल यांनी विद्यार्थ्यांना दिला. या वेळी १६८ विद्यार्थी व २२ शिक्षकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे अहवाल वाचन प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी केले. प्रा. लेल्ले यांनी आभार मानले.