पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- जीवन अमूल्य आहे; परंतु ते जगत असताना त्यामध्ये जगण्याची उत्तम प्रत राखणेही तेवढेच गरजेचे आहे. जीवन तेवढेच आनंदी, उत्साही आणि निरोगी असायला हवे आणि ते कशा प्रकारे जगता येते, याबद्दलचे मार्गदर्शन पूना प्रीव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी केले.
ऑल इंडिया पोस्टल अँड आर एम एस पेन्शनर असोसिएशनतर्फे पुणे रिजनच्या सेवानिवृत्तांचा मेळावा नुकताच साने गुरुजी स्मारक पर्वती पुणे येथे पार पडला या मेळाव्यामध्ये दीर्घायुष्याची गुरुकिल्ली या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी सीजीएचएसचे संचालक डॉ. सी. पी. चौधरी, चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. संजीव केंद्रे, महा सर्कल सेक्रेटरी अरविंद शिवतारे, राजकुमार आतकरे, उमाकांत बालगुडे, ए. व्ही. पाठक आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
योग्य वेळी योग्य त्या तपासण्या, नियमित उपचार, संतुलित आहार, मानसिक ताणतणाव यांचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच वृद्धापकाळात येणारा एकटेपणा कसा दूर करावा, याबाबत डॉ. पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.
गेल्या पंधरा वर्षांपासून विनाशस्त्रक्रिया प्रतिबंधात्मक किंबहुना पर्यायी हृदयरोग उपचारांमध्ये काम करत असताना अनेक रुग्णांना विशेषता वृद्ध रुग्णांची हृदय शस्त्रक्रिया टाळून त्यांनी नवसंजीवनी दिल्याबद्दल संघटनेकडून डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना अशा मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे, असे डॉ. चौधरी याप्रसंगी म्हणाले.